June 16, 2021

Marathi Live News

Marathi Live News

साऊथँम्प्टन क्रिकेट मैदान भारतासाठी ठरलेय अनलकी!

1 min read

 978 total views,  2 views today

साऊथॅम्प्टन क्रिकेट मैदान भारतासाठी ठरलेय अनलकी !

इंग्लंडमधील हँपशायर परगण्यात (कौंटीत) असलेल्या साऊथॅम्प्टन शहरातील रोझ बाऊल स्टेडियम असून येथील प्रेक्षक क्षमता सोळा हजार इतकी आहे. सन २००१ मध्ये या स्टेडीयमची निर्मिती करण्यात आली. या मैदानावर पहिला अधिकृत एकदिवसीय सामना सन २००३ मध्ये दक्षिण आफ्रिका व झिंबाब्वे यांच्यात झाला. तर सन २००५ मध्ये इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान खेळलेला टि२० सामना येथील पहिला टि२० सामना होता. तर १६ ते २० जून या अवधीत या स्टेडीयमवर पहिला कसोटी सामना इंग्लंड व श्रीलंका यांच्यात खेळला गेला होता.
साऊथॅम्प्टन येथील रोझ बाऊल मैदानावर सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना लाभ होतो तर तिसऱ्या दिवसानंतर फिरकी गोलंदाजही येथे आपले कसब दाखवायला सुरुवात करतात. फलंदाजांनी संयम राखल्यास आपले बॅटींग कौशल्य दाखवून धावा बनविता येतात.
भारत येथे आतापर्यंत दोन कसोटी व ५ वनडे सामने खेळले असून त्यापैकी दोन्हीही कसोट्यात भारताला यजमान इंग्लंडकडून पराभव पत्करावे लागले आहेत. तर पाचपैकी ३ एकदिवसीय सामन्यात भारत हारला असून सन २००४ मध्ये केनिया विरूध्द तर सन २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूध्द भारताला विजय मिळाले तर इंग्लंड विरूध्द दोन सामन्यात भारताला अपयशाचा सामना करावा लागला होता. सन २०१९ ची वनडे विश्वचषक स्पर्धा जिंकण्याचे भारताचे स्वप्न याच मैदानावर झालेल्या सामन्यात न्यूझिलंडने भारताला हरवून उध्वस्त केले.

भारत येत्या १८ जून पासून न्यूझिलंड विरूध्द वर्ल्ड टेस्ट चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना याच मैदानावर खेळणार आहे. भारताचा तटस्थ ठिकाणी हा पहिला कसोटी सामना असणार आहे. आजपर्यंतचा इतिहास सांगतो की, साऊथॅम्प्टनचे रोझ बाऊल स्टेडियम भारताला रास आले नाही. सन २०१४ मध्ये भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली येथे आपला पहिला कसोटी सामना खेळला. त्या सामन्यात इंग्लंडने पहिला डाव ७ बाद ५६९ धावांवर घोषित केला. तर भारत ३३० धावांत सर्वबाद झाले. नियमाप्रमाणे भारताला फॉलोऑन बसला होता. परंतु इंग्लंडने भारताला फॉलोऑन न देता स्वतः फलंदाजी दिली व दुसरा डावही ४ बाद २०५ धावांवर घोषित केला. इंग्लंडने दिलेले ४४५ धावांचे लक्ष भारताला पेलले नाही व संपूर्ण संघ १७८ धावात कोसळला. त्या सामन्यात भारत २६६ धावांनी पराभूत झाले.
सन २०१८ ला भारत विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळले परंतु इतिहासात कायम राहिला. इंग्लंडचा पहिला डाव २४६ धावांत आटोपल्यावर भारतालाही पहिल्या डावात जेमतेम २७३ धावा बनविता आल्या. इंग्लंड दुसऱ्या डावात २७१ धावाच करू शकल्याने भारताला फक्त २४५ धावांचं लक्ष मिळाले. परंतु भारतीय फलंदाज केवळ १८४ धावाच काढू शकल्याने भारताला ६० धावांनी सामना गमवावा लागला.
या मैदानावरचं वैशिष्टये म्हणजे येथे केवळ भारताच्या चेतेश्वर पुजारालाच शतक ठोकता आले असून दोन कसोट्यात चार डावात त्याला केवळ १६३ धावाच बनविता आल्या आहेत. शिवाय भारताचे आधारस्तंभ असलेले विराट कोहली ४ डावात १७१ धावा, अजिंक्य राहाणे ४ डावात १६८ धावा व रोहीत शर्मा दोन डावात ३४ धावा जमवू शकल्याने भारतीय फलंदाजी हिच चिंतेचे खरे कारण आहे.
भारताचे गोलंदाजही येथे लौकीकाप्रमाणे कसब दाखवू शकले नाहीत. भारताच्या एकाही गोलंदाजाला या मैदानावर एकदाही डावात पाच बळी मिळविता आले नाहीत. गोलंदाजांपैकी मोहम्मद शमीला २ कसोटयात ७ बळी, तसेच जसप्रित बुमराहा ४, ईशांत शर्मा ४, रविंद्र जडेजा ५ व रविचंद्रन आश्विन ३ बळी प्रत्येकी एका कसोटीत मिळवू शकले आहेत. त्यामुळे भारतीय गोलंदाज या मैदानावर कशी कामगिरी करतात यावर भारताचे बरेचसे भवितव्य अवलंबून असेल.
विशेष म्हणजे मागच्या दौऱ्यातील
विराट कोहली (कप्तान), लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य राहाणे, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, हनुमान विहारी, इशांत शर्मा, उमेश यादव, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह हे तेरा खेळाडू या संघातही असल्याने भारतीय संघाच्या कामगिरीकडे उत्सुकतेने बघितले जात आहे.
इंग्लंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज मोईन अलीने सन २०१४ मध्ये ७ तर सन २०१८ मध्ये ९ असे १६ बळी घेऊन भारतीय फलंदाजांना सतावले असल्याने फिरकी खेळण्यात पटाईत असलेल्या भारतीय फलंदाजांची सत्वपरिक्षा होणार आहे. कारण हा सामना इंग्लंडविरुद्ध नसून न्यूझिलंड विरूध्द असणार आहे. कारण न्यूझिलंडचे वेगवान गोलंदाज टिम साऊथी, ट्रेंट बोल्ट, निल वॅगनर, ग्रँड होम भारताला त्रासदायक ठरू शकतात, शिवाय डावखुरा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनर भारताला धोका ठरू शकतो.
शिवाय सन २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामन्यात न्यूझिलंडने भारताला येथेच हरविले असल्याने न्यूझिलंडचे मनोधैर्य भारतापेक्षा वरचढ असणार !
मागील तीन वर्षात भारताने आपल्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा केली असल्याने भारतीय संघाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे हा अंतिम सामना दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेचा ठरला आहे. आता या मैदानावर भारताचा कसोटी हरण्याचा इतिहास बदलतो का काय ? हे बघणे मनोरंजक ठरेल.

लेखक : –
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright ©www.marathilivenews.in | LM +91 8698593194 | Newsphere by AF themes.