June 16, 2021

Marathi Live News

Marathi Live News

इंग्लिश क्रिकेट बोर्डाने घालून दिला एक वेगळा आदर्श

1 min read

 1,152 total views,  2 views today

इंग्लिश क्रिकेट बोर्डाने एक वेगळाच आदर्श घालून दिला.

इंग्लिश क्रिकेट बोर्ड म्हणजे ईसीबी हे जगातील सर्वात जास्त प्रयोगशिल व डेअरींगबाज क्रिकेट बोर्ड आहे. आज पर्यत इसीबीने क्रिकेटमध्ये अनेक नवनवीन प्रयोग केले आहेत. तसेच काही कठोर निर्णय घेऊन त्याची सक्तीने अंमलबजावणी सुध्दा केली आहे. त्यामुळे जगभरातील इतर क्रिकेट बोर्डांसमोर एक आगळावेगळा आदर्श ठेवला आहे.
ईसीबीने आपला राष्ट्रीय संघ निवडताना खेळाडूंचे क्रिकेट कौशल्य, कामगिरी, तंदुरूस्ती या व्यतिरिक्त त्याचे सार्वजनिक जीवनातील वर्तन याचबरोबर सोशल मिडीया वरील त्या संबंधीत खेळाडूने केलेल्या पोस्टचा देखील विचार करून त्याची संघातील निवड अवलंबून असणार आहे. असे अधिकृतपणे जाहीर केले आहे.
२ ते ६ जून या कालावधीत इंग्लंड व न्यूझिलंड यांच्या दरम्यान जगप्रसिद्ध क्रिकेट स्टेडीयम लॉर्डसवर दोन कसोटी सामान्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना संपन्न झाला. या सामन्यात न्यूझिलंडचा डावखुरा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे याने पदार्पणातच द्विशतक ठोकून अनेक विक्रम मोडीत काढत स्वतःचे नाव विक्रमांच्या पुस्तकात दिमाखात लिहीले.
त्या सामन्यात इंग्लंडकडून २७ वर्षीय वेगवान गोलदांज ओलिव्हर एडवर्ड ऑली रॉबिन्सन याने देखील आपले कसोटी पदार्पण धडाक्यात साजरे केले. या सामन्यात त्याने न्यूझिलंडच्या पहिल्या डावात ७५ धावात ४ व दुसऱ्या डावात २५ धावात ३ असे एकूण सामन्यात १०० धावात ७ फलंदाज बाद केले. शिवाय फलंदाजीत इंग्लिश संघ अडचणीत असताना सलामीचा फलंदाज रॉरी बर्न्सला मोलाची साथ देत स्वतःही ४२ धावांची शानदार खेळी केली. त्याच्या या अष्टपैलू खेळामुळे त्याची सर्वत्र वाहव्वा होत होती. मात्र त्याच वेळी याच ऑली रॉबिनसन याने ९ वर्षापूर्वी म्हणजे सन २०१२ मध्ये सोशल मिडीयावर वर्णद्वेष व लिंगभेद या स्फोटक विषयांवर अभद्र शब्दात मतप्रदर्शन केले होते. ऑलीने कसोटी पदार्पण केल्यानंतर त्याने पूर्वी पोस्ट केलेल्या ट्वीटच्या फोटोकॉपीज प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे समाजाच्या विविध स्तरातून रॉबिन्सनची निर्भत्सना होऊ लागली. या घटनेमुळे इंग्लिश क्रिकेट बोर्डाची मोठी बदनामी झाली. या बाबीची गंभीर दखल घेत ईसीबीने रॉबिन्सनच्या अष्टपैलू खेळाची कोणतीही कदर न करता त्याला संबंधीत प्रकरणाची चौकशी पूर्ण होई पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी निलंबीत केले आहे. आता त्याच्या वरील चौकशी पूर्ण होऊन त्याला क्लिनचीट मिळेपर्यंत त्याला इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय स्तरावरून कुठल्याही सामन्यात खेळता येणार नाही. याचाच अर्थ पहिल्या कसोटीत इतकी जोरदार कामगिरी करूनही न्यूझिलंडविरूध्द दुसऱ्या कसोटीत आपल्याला तो खेळताना दिसणार नाही.
झालेल्या कारवाईनंतर रॉबिन्सनने नऊ वर्षापूर्वी त्याने केलेल्या ट्वीटमुळे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला इतका जोरदार झटका बसेल व त्याची त्याला एवढी मोठी शिक्षा भोगावी लागेल याची कल्पनाही केली नव्हती. मी कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाही. “माझ्या त्या कृत्याचा मला पश्चाताप होत आहे. माझ्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत त्यांची मी मागतो. असा माफीनामाही केला आहे.”
या प्रकरणानंतर इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट, संघ सहकारी खेळाडूंनी पाठराखण केली तर इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन व क्रिडा सचिव ऑलिव्हर डॉडेन यांनी ईसीबीला आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याचा सल्ला दिला आहे.
वास्तविक हे प्रकरण ९ वर्षापूर्वीचे आहे. रॉबिन्सन त्या वेळी अपरिपक्व होता. परंतु सार्वजनिक जीवनात काही गोष्टींबाबत जबाबदारीने वर्तन कारायचे असते. हे तो विसरला असावा. क्रिकेटपटूंना क्रिकेट रसिक देवाचा दर्जा देतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे अनुरसण करतात तेंव्हा खेळाडूंनी आपल्यावरील जबाबदारीचे भान ठेवणे गरजेचे आहे.
सकृत दर्शनी ईसीबीने उचललेले हे पाऊल कठोर वाटत असले तरी स्वस्तात मिळणारी प्रसिध्दी व अमाप पैसा या खेळाडूंच्या डोक्यांत शिरतो. त्याचाच उन्माद म्हणून त्यांच्या कडून असे बेताल वर्तन घडल्याचे अनेक किस्से क्रिकेट जगताने अनुभवले आहेत. त्यामुळे अशा मुजोर क्रिकेटपटूंना वठणीवर आणणे गरजेचे आहे. त्यामुळे ईसीबीने उचललेले पाऊल खरोखरच समर्थनीय असेच आहे. जेणे करून कोणताही क्रिकेटपटू असे बेताल वागणार नाही. ईसीबीच्या या कठोर निर्णयाचे इतर देशांच्या क्रिकेट मंडळांनी देखील अनुकरण करावे.

लेखक : –
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright ©www.marathilivenews.in | LM +91 8698593194 | Newsphere by AF themes.